Saturday, March 13, 2010

लेक जिनिवा (Lake Geneva)

शिकागोला आल्यापासून snowfall चालू असल्यामुळे कुठेच जाता आलं नव्हतं... थोडासा snowfall कमी झाल्यावर रविवारी ( फेब्रुवारी २००९) लेक जिनिवाला (Lake Geneva) जायच ठरलं. लेक जिनिवाला स्नो स्कल्प्चर ( बर्फाच्या प्रतिकृती) ची स्पर्धा होती. शनिवारी यु. एस. (US) मधून वेगवेगळ्या ठिकाणाहुन लोकं येऊन स्कल्प्चर्स बनवणार होती आणि आम्ही रविवारी ते बघायला जाणार होतो. लेक जिनिवा आमच्या शेजारच्या राज्यात म्हणजे विस्कॉन्सिन (Wisconsin) स्टेटमध्ये मध्ये आहे. इलिनॉय (Illinois) स्टेट, जिथे मी सध्या राहतो तिथे बराचसा भाग हा पठारी प्रदेशासारखा आहे. विस्कॉन्सिन मात्र एकदम हिल स्टेशन आहे, डोंगर, घाट, जंगल वगैरे.

अंदाजे तासाच्या प्रवासानंतर आम्ही लेक जिनिवाला पोहोचलो. लख्ख उन पडलं होतं त्यामुळे अर्थातच तापमान पण वाढलं होतं. लेक दिसण्याआधी एक मोठं मैदान दिसलं. मैदानावर सगळीकडे बर्फ होता आणि त्यावर वाट्टेल तिथे गाड्या पार्क केल्या होत्या...क्षणभर वाटलं किती बेशिस्त पार्कींग केलंय...पण तेव्हढ्यात कळलं की ज्याला आम्ही मैदान समजत होतो तोच होता लेक जिनिवा....गोठलेला....Frozen Lake Geneva.


लेक
गोठण ही संकल्पनाच डोक्याला पटणारी होती....लेक वर गाडी पार्क करण्यासाठी जिथून गाडी आत न्यायची जागा होती तिथे स्पष्ट इंग्रजीत "Park at your own risk" अर्थात स्वताच्या जबाबदारीवर पार्क करा असं लिहिलं होतं. ती पाटी वाचल्यावर पुणेकर कुठपर्यंत पोहोचलेत असं वाटलं आणि उगाच मनातल्या मनात हसायला आलं. भलती सलती रीस्क घ्यायची इच्छा नव्हती म्हणून मग आम्ही पुढे जाऊन रस्त्यावर गाडी पार्क केली. तळ्याच्या बाजूलाच उघड्यावरती 'त्या' प्रतिकृती बनवल्या होत्या. मगाशी म्हणाल्याप्रमाणे तापमान वाढल्याने प्रतिकृती नाही पण प्रतीकृतींचे भग्न अवशेष पाहायला मिळाले. नाही म्हणायला प्रतिकृती कसली आहे हे कळायला तिथे कागदावर प्रतिकृतीच्या डिझाईनची प्रिंट ठेवली होती. ती प्रिंट पाहून थोडी फार कल्पना येत होती..पण मजा नाही आली...

मग थोडेसे वैतागलेले असे आम्ही जवळच जाऊन जरा खाऊन आलो. तिथेच हेलीकॉप्टर राईड होती. आमच्यापैकी काही जणांनी ती राईड घ्यायचा प्लान केला. मिनिटांसाठीची किम्मत विचारात घेता फ्रोझन लेक वर फिरायला जाण्यातच शहाणपणा वाटला. तळ्याच्या काठावर थोडे फोटो काढून मग मी आणि माझे तीन मित्र अश्या चौकडीने स्नो वर मार्गक्रमणाला सुरवात केली. काठाच्या जवळचा स्नो थोडा वितळला होता. पोहायच्या बाबतीत शून्य असल्यामुळे मला भलतीच भीती वाटत होती, मध्यावर पोहोचल्यावर काठावरचा स्नो पूर्ण वितळला तर.......

एकमेकांमध्ये पूरक अंतर ठेवून आम्ही चालत होतो....thanks to वुडलँड शूज..घसरतो आहे असं फार कमी वेळा वाटलं ते निव्वळ शूजमुळे. आमच्यापैकी एकाचे साधे स्पोर्ट्स शूज होते त्याला जाम भीती वाटत होती घसरण्याची. त्यात त्याचा वजनी गट पण वेगळा असल्यामुळे घसरल्यास बर्फ फुटून थेट लेक मध्ये पडायची त्याला भीती वाटत असावी असं मला उगीचच वाटत होता....शेवटी पुढे जाऊ का नको ह्या विचारावर रिकाम्या पेल्याने कब्जा मिळवला आणि त्याने माघार घेतली आणि पाठ फिरवून काठाचा मार्ग पकडला. आता आम्ही तिघे नेटाने रस्ता नाही बर्फ कापत होतो. लक्ष्य होता लेकच्या मधल्या भागात फिशिंग करणारी लोकं..

"अंतर ठेवा, जवळ-जवळ पावलं टाका...तिथून जाऊ नका, तो नुकताच वितळून तयार झालेला स्नो दिसतोय" अशा एक ना अनेक सूचना एकमेकांना देत चालत होतो. शेवटी फिशिंग करणाऱ्या लोकांपाशी पोहोचलो. फ्रोझन लेकमध्ये मासेमारी कशी करतात ह्याचं उत्तर लेकवरून चालतानाच कळलं, जेव्हा कुपनलिकेच्या आकाराची छिद्रं दिसत होती. एकदम प्रिन्सची (आपला इंडीयन सुपरस्टार, कुपनलिकेत अडकलेला) आठवण आली. इथे कोणी आत गेला असता तर तो यु एस मधला प्रिन्स झाला असता आणि CNN ने त्याचं रेस्क्यु ऑपरेशन कव्हर केलं असतं :)

शेवटी त्यातल्या त्यात जवळच्या एका फिशरमनपाशी पोहोचलो. वय वर्ष पन्नासच्या आसपास आणि थंडीत मासेमारी, चांगलाच उत्साह होतो चिरतरुणाला. त्या माणसाला जरा माहिती विचारायला गेलो तर "मी आत्ताच आलोय त्यांना विचारा" असं म्हणत त्याने दुसऱ्या माणसाकडे हात दाखवला. तो पण ह्याचा मित्र होता बहुतेक. ह्या दुसऱ्या माणसाने मासेमारी बरीच सिरीयसली घेतली होती. - तास तो तिथे बसलेला होता आणि एकच मासा त्याच्या गळाला लागला होता, माहीत नाही किती मोठा लागला होता. त्याच्याकडे एक डीजीटल उपकरण होतं. त्या उपकरणातून स्नोच्या खाली त्याचा गळ आणि त्याला मासा लागला तर त्याची माहिती लगेच त्याच्याकडे असलेल्या डिस्प्लेवर कळत होती. तो डोळ्यात तेल घालून डिस्प्लेवर नजर ठेवून होता आणि आमच्याशी गप्पा मारत होता. एक रंगाचा डब्बा उलटा ठेवून त्यावर एक चादरीची घडी ठेवून त्यावर बसून हा सगळा कारभार चालू होता त्याचा. एकंदरीतच खूप संयमाने करायचं काम होतं. स्नोचा थर किती जाड होता हे त्याने आम्हाला सांगितलं तेव्हा स्नो वितळला तर काय होईल ही माझी भीती पळून गेली. २० इंच जाडीचा स्नो होता...

तिथेच जवळच त्याने एक तंबू पण टाकला होता, होय लेकवरच. झोपायला वगैरे नाही तर भूक लागल्यावर काहीतरी बनवायला. थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारून आम्ही परत किनाऱ्याच्या दिशेने निघालो. स्नोची जाडी आता कळाली होती त्यामुळे कसलीही भीती वाटत नव्हती. त्यात आता निसरड्या स्नोवर चालायची सवयपण झाली होती मग आता सुरवात झाली ती मुद्दामुन स्कीट करायची. थोडसं जोरात चालत जाऊन मग एकदम ब्रेक लावल्यावर मिळणारा स्कीट चा अनुभव एकदमच वेगळा होता. किनाराच्याजवळ कोणीतरी गोल्फ खेळायचा प्रयत्न केला होता. गोल्फचे बरेच बॉल्स तिथे स्नो मध्ये रुतले होते. बरेच कष्ट करून एक बॉल बाहेर काढला आणि घरी घेऊन आलो लेक जीनिवाची आठवण म्हणून.

हर्षद पाटील

Labels:

1 Comments:

Blogger Unknown said...

hey Harshad....
lots of information...good one

May 6, 2010 at 5:43 PM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home